Monday 19 September 2011

रचना....सुयोग्य रचना.....कॉम्पोझिशन

आपण जेव्हा एखादा फोटो हा उत्तम फोटो म्हणतो तेव्हा त्यातल्या घटकांची योग्य रचना,एकमेकांशी असणारी प्रमाणबद्धता लक्षात घेतली पाहीजे.अशी सुयोग्य रचना करण्याकरीता काहीही नियम लिहीले गेले नसले तरी काही जगप्रसिद्ध छायाचित्रकारांनी काढलेल्या छायाचित्रांवरुन काही निष्कर्ष काढले गेले आहेत.फोटोग्राफ उत्तम यायला हवा यासाठी पुढील गोष्टी संभाळायला हव्यात.लेन्सच्या डायफ्रामची योग्य योजना,शटरस्पीड,फोकसिंग,एक्सपोजर,योग्य डेव्हलपमेंट,आणि परफेक्ट प्रिंटींग.याचाच अर्थ असा की उत्तम फोटोसाठी तंत्रावर काबू हवा.आपण जे छायाचित्र काढणार आहोत ते निर्जीव वाटू नये.ते बोलके असावे,त्यासाठी त्या फोटोकरीता निवडलेली फ्रेमची योग्य चौकट असावी.फोटोमधील प्रकाशयोजना,त्यांची मांडणी, एकमेकांशी असलेले प्रमाण,फ्रेममधील सुसंगती या गोष्टी बघायला हव्यात.चित्रातील मुख्य विषय हा फ्रेममध्ये कोणत्याही गोल्डन पॉईंटवर यायलाच हवा.गोल्डन पॉईंट

निसर्गत: माणसाची दृष्टी डावीकडून उजवीकडे व वरुन खाली या दीशेने असते.याचा विचार रचना करताना करावा.उदा.चित्रातील आडव्या रेषा म्हणजेच झोपलेली व्यक्ती,पडलेले झाड,समुद्र क्षितीज रेषा त्याला समांतर लाटा यातून चित्राची लांबी वाढल्याचा भास होतो.स्थैर्य,शांतता,विश्रांती दर्शवतात.उभ्या रेषा म्हणजेच एखादा पुतळा,गगनचुंबी झाडे ,इमारती,इ.,तून चित्राची उंची वाढल्याचा भास होतो व ताठपणा दर्शवतात.तिरप्या रेषा उदा.सायकल वेगात चालवताना चालवणार चालक तिरका असतो,ताठ उभी झाडे वा-याने तिरकी होतात.अश्या चित्रातील तिरप्या रेषा माणसांच्या विचारांना हलवतात.वळणदार रेषा उदा.विजलेल्या ज्योतीची धूराची वलये,कमनीय देहाचे सौष्ठ,नर्तिका,इ.तून चित्रात लयबद्धता येते,हलचाल जाणवते.चित्रातील घटक हे एकमेकांपासून कीती अंतरावर,व कीती आकारमानाचे आहेत याचा तोल संभाळणे.व्ह्यू पॉईंट बदलला तर परस्पेक्टीव्ह कंट्रोल करता येते.याचे चार प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.लिनीअर परस्पेक्टीव्ह.....एकमेकांना मिळणा-या रेषा व वस्तू दूर असताना लहान होत जाणे यामुळे चित्रात खोली निर्माण होते.एरीअल परस्पेक्टीव्ह.....दृष्यामधील टोन्स व कॉन्ट्रास्ट च्या सहाय्याने दूर अंतराचा भास निर्माण करता येतो.अलिकडचा भाग स्पष्ट व नंतरचा भाग हळूहळू पुसट होत जाणे.ब्ल्यू फील्टर्चा वापर करुन दूरचा भाग अधिक धूसर करता येतो.सिलेक्टीव्ह फोकस......याचा अर्थ लेन्सच्या मदतीने फोकसिंग करणे आणि अ‍ॅपरचरच्या सहाय्याने चित्रातील डेप्थवर ताबा मिळवणे.स्केल......चित्रातील सर्वात उंच भागाचे महत्व वाढण्यासाठी चित्रातील इतर घटक तुलनेने जवळ असणे.

Sunday 11 September 2011

फोकसिंग

फोटो घेताना कॅमे-यातील तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रतिमा सुस्पष्ट करणे आणि यासाठी फील्म व भिंग यामधील अंतर कमी जास्त करावे लागते.कॅमे-यात वस्तू व विषय जसजसा कॅमे-याच्या जवळ येईल तसतसे भिंग आणि फील्म यामधील अंतर वाढायला लागते. उलटपक्षी विषय जसाजसा दूर गेला तर भिंग फील्मच्या बाजूला सरकते पण ते अंतर केंद्रान्तरापेक्षा कधीही कमी होत नाही.उलटपक्षी प्रतिमा मोठी मिळविण्यासाठी कॅमेरा विषयाच्या जवळ नेऊन फिल्म आणि भिंग यामधील अंतर दुप्पट कींवा तिप्पत होते.या प्रकारच्या कॅमे-यांना डबल एक्सटेंशन कींवा ट्रीपल एक्सटेंशन असे म्हणतात.कॅमे-यात फील्म भरली असता वेगळ्या यंत्राद्वारे फोकसिंग करता येते. याचे प्रकार पुढीलप्रमाणे...स्प्लीट इमेज , ग्राऊंड ग्लास, मायक्रोप्रिझम हे होत.

अ‍ॅपरचर

यामुळे प्रकाश कीरणांच्या संख्येवर नियंत्रण करता येते. जास्त उघडलेला भाग ( मोठे अ‍ॅपरचर ) जास्त संख्येने प्रकाशकीरण आत जातात. कमी अ‍ॅपरचर कमी प्रकाशकीरन आत जातात. यांना f नंबर वापरतात.कॅमे-यावर हे नंबर १,४,२,२.८, ४,५.६, ८, ११,१६ अश्या पद्धतीने आपल्याला असलेले दिसतात.हे आकडे सुद्धा प्रमाण दर्शवतात.म्हणून यापुढे कोणतेही मोजमाप नाही. या आकड्यांचेही एकमेकांशी नाते असते. एका स्टॉपकडून दुस-या स्टॉपकडे गेल्यावर प्रकाश कीरणांची संख्या निम्मी कींवा दुप्पट होते. ह्याला स्टॉपिंगडाऊन असेही म्हणतात. उलत ८ कडून ५.६ कडे गेल्यास प्रकाश कीरणांची संख्या दुप्पट होते. ह्याला ओपनिंगअप असे म्हणतात. सध्या प्रचलित असलेले f/no. म्हणजे f/1.4, f/2, f/4, f/5.6, f/8, f/11, f/16, f/22. अ‍ॅपरचर हे हाफ स्टॉप ने बंद किंवा उघडता येते. उदा.2.8 आणि 4 यामध्ये 3.5 तसेच 5.6 व 8 यामध्ये 6.3 असे नंबर येतात. शटर्स मात्र इनबिटवीन चालत नाही.

Friday 9 September 2011

बेसिक सेटींग्ज ऑफ कॅमेरा

छायाचित्र घेण्यापूर्वी कोणत्याही कॅमे-यात प्रामुख्याने तीन गोष्टींचा विचार करावा लागतो.

१) शटरस्पीड २) अ‍ॅपरचर ३) फोकसिंग

शटरस्पीड

शटरस्पीडमुळे पडणा-या प्रकाशाच्या वेळेवर बंधन येते.शटर उघडून प्रकाश आत गेल्यावर परत शटर बंद होणे या क्रीयेला शटरस्पीड असे म्हणतात.साध्या बॉक्स कॅमे-यात हे शटरस्पीड एकच एक किंवा फारतर काहींना दोन असतात.पण आत्ताच्या कॅमे-यांना ही शटरस्पीड तीन, चार पासून आठ ते दहा अशी असू शकतात.याचे आकडे एकका नॉबवर आपल्याला दीसतात.जसे एक दोन चार आठ वैगरे.प्रत्यक्षात हे आकडे जरी पूर्णांकात असले तरी हे सेकंदाचा भाग दर्शवतात. म्हनजे नॉब वरचा ३० हा आकडा लावला असता शटर उघडून बंद होण्याची क्रीया १/३० सेकंद इतकी असते.छेदाचा आकडा जेवढा मोठा तेवढे शटरस्पीद जास्त वेगानेकार्यान्वित होते. छेदाचा आकडा लहान तेवढे शटरस्पीड स्लो होते.आजकालच्या कॅमे-यात B,1,2,4,8,15,30,60,125,250,500,1000.असे साधारणपणे आकडे असतात.प्रत्येक आकडयाचा एकमेकांशी संबंध असतो.जसजसा आकडा लहान प्रकाशाचा वेळ दुप्पट होतो.आकडा मोठा तसा प्रकाशाचा वेळ निम्म्याने होतो.जसे ६० आकड्याच्या जागी ३० आकडा वापरला तर प्रकाशवेळ दुप्पट होईल.
संख्या शास्त्राप्रमाणे १/१५ सेकंद १/८ च्या निम्मे नाही तर १/१२५ सेकंद हे १/६० च्या निम्मे नाही पण कॅमेरा करणा-यांनी सोय म्हणून हा बदल केला आहे.प्रकाशदर्शनात (exposure) ह्यामुळे काहीही फरक पडत नाही.काही कॅमे-यात T व B ही शटरस्पीड असतात.B मध्ये कॅमे-याचे बटण दाबताच शटर उघडते व बटणावरील बोट काढताच शटर बंद होते.T मध्ये बटण दाबताच शटर उघडते व दाब काढला तरी शटर बंद होत नाही. पुन्हा शटर बंद करण्याकरीता बटण पुन्हा दाबावे लागते.

इतिहास

प्रकाशचित्रणाच्या इतिहासाचा विचार करता प्रकाशचित्रणाचा शोध लावण्याचे श्रेय कोणा एका व्यक्तीकडे जात नाही. फोटोग्राफीच्या निर्मितीमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले.अणि त्याकरीता शास्त्र विषयाच्या विविध शाखांची मदत घ्यावी लागली. जसे पदार्थविज्ञान, रसायन,अभियांत्रिकी इत्यादी.लॅटीन भाषेतील ’ कॅमेरा’ या शब्दाचा अर्थ " अंधारी खोली " असा आहे.१०व्या-११व्या शतकातील अलहसन (इराण) यांच्या लिखाणात या अंधा-या खोलीचा उल्लेख सापडतो.खोलीच्या दाराच्या छिद्रातून आलेल्या प्रकाशामुळे भिंतीवर उलटी आणि खरी प्रतिमा मिळते.प्रत्येकवेळी हव्या त्या दृष्याउढे खोली नेणे शक्य नाही.या अडचणीतून कॅमेरा ऑब्स्कुरा ची निर्मिती झाली.गिलोलार्मो गार्डीनो याने लेन्स बसविली. दृष्य जेवढे मोठे असेल व हवे असेल तेवढ्या मोठ्या आकाराचा कॅमेरा बनवावा लागत असे.पुढेपुढे अनेक प्रयोगातून सहज हाताळण्याजोगा म्हणून आज जे कॅमेरे बाजारात उपलब्ध आहेत यांची निर्मिती झाली.एकमेकांत घट्ट बसणा-या दोन पेट्या ,एका पेटीला भिंग,दुस-या पेटीला स्क्रीन मागे पुढे करण्याची सोय, अश्या अधिक सुधारणा होत गेल्या.१६ व्या शतकात ४५ अंशाचा कोनात आरसा बसवून चित्रपेटीच्या पृष्ठभागावर प्रतिमा घेता येण्याची सोय झाली.मिळालेले चित्र कायम करण्यासाठी रसायनतज्ञ पुढे आले.
अ‍ॅन्जेलो सोला (१६१४) याच्या सिल्व्हर नायट्रेट सुर्यप्रकाशात काळे पडते हे लक्षात आले.१९व्या शतकात थॉमस वेजवूज याने निगेटीव्ह प्रिंटचा शोध लावला.फ्रान्सच्या जोसेफ निबसेने १८२० मध्ये काचेवर सुप्त प्रतिमा मिळवली.तेव्हा त्यास वेळ ४ ते ८ तास लागत असे. डॅग्युरर याने १८३७ साली प्लेट कॅमेराची पद्धत अवलंबविली. त्यामुळे हा लागणारा वेळ ५ ते ४० मिनीटांवर आला.त्याला डॅग्युरर टाईप फोटो म्हणून प्रसिद्धी मिळाली. जोसेफ पेटझवल्ड याने डबल लेन्स लावून प्रकाशाची तीव्रता वाढवली आणि ही वेळ १ मिनीटांवर आणली.
इंग्लिश शास्त्रज्ञ हेन्री फॉक्स टॅलबोट (१८८०) याने चित्रांच्या प्रतिकृती काढण्याचे तंत्र कार्यवहीत आणले. त्याला आधुनिक प्रकाशचित्रणाचा जनक म्हणतात. याच काळात सर जॉन हर्षल याने फोटोग्राफ या शब्दाचा प्रथम वापर केला. निगेटीव्ह पॉझिटीव्ह हे शब्द प्रथम प्रचारात आणले. सन १८५१ मध्ये कलोडीनचा वापर होऊ लागला.कलोडीन म्हणजे इथर आणि अल्कोहोलचे मिश्रण.ही प्लेट ओली असतानाच कॅमे-यात बसवत असत.म्हणून त्याला ’वेट प्रोसेस’ म्हणतात.नंतर १८७१ मध्ये जिलेटीनचा शोध प्रो. रिचर्ड मेडॉक्स याने लावला.त्यामुळे एकूण प्रक्रीयेला गती आली आणि वेट प्रोसेसची जागा ड्रायप्लेट ने घेतली.ग्लासप्लेट ने-आण करण्यास अतिशय जड म्हणून ’इस्टमन’ या अमेरीकन माणसाने सेलोलाईडचा उपयोग केला. (१८८८) इमल्शन तयार करण्याच्या पद्धतीत बरीच सुधारणा झाल्यामुळे फोटो घेण्यास लागणारा वेळ १ मिनीटांवरुन १/१००० सेकंद इतका कमी झाला. भिंगाची प्रकाश ग्रहण करण्याची शक्ती वाढली. वेगवान भिंगे तयार होऊ लागली.पीन होल कॅमे-याचे दीवस मागे पडले.रंगीत फोटोला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले. अश्या प्रकारे अनेकांच्या हातभाराने, त्यांनी केलेल्या प्रयोगांनी प्रकाशचित्रणाचा इतिहास घडत गेला.